नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज एक महत्वाची आढावा बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी किती सज्जता आहे, खास करुन मानुष्यबळ किती आहे, याची चाचपणी या बैठकीत केली जाणार आहे.
कोरोना टास्क फोर्सपासून आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनीही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राष्ट्रीय लॉकडाउन आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं आहे. याच पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीमध्ये काही मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. रविवारी (२ मे २०२१ रोजी) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही बैठक सुरु झाली आहे. केंद्र सरकारच्या टास्क फोर्समधल्या काही सदस्यांनी देशभरात कडक लॉकडाउन लावण्याची भूमिका मांडली आहे. वेगाने होणारा प्रसार फक्त लॉकडाउननेच नियंत्रणात आणता येईल. जेव्हा कोरोनाचा समूह प्रसार होतो, तेव्हा चाचण्या करणं कठीण होऊन जातं. त्यामुळे सगळेच कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं गृहीत धरून तुम्हा त्यांना एकमेकांच्या संपर्कात येण्यापासून रोखू शकता. आणि हे फक्त लॉकडाउनमुळेच शक्य आहे, असं टास्क फोर्सने म्हटलं आहे.
अमेरिकन प्रशासनातील मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. अँथनी यांनी दिला सल्ला
नुकतेच अमेरिकन प्रशासनातील मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. अँथनी एस. फौसी यांनी देखील याच धर्तीवर भारताला सल्ला दिला आहे. “भारतात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. रुग्णालयात ऑक्सिजन आणि बेड्स मिळत नाहीत. औषधांचा काळाबाजार सुरु आहे. त्यामुळे रुग्णांसोबत सामन्य जनता अडचणीत आली आहे. कोरोनाच्या विस्फोटामुळे भारतात यावेळी कठीण परिस्थिती आहे. त्यामुळे आता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लावण्याची गरज आहे.















