जळगाव (प्रतिनिधी) महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जळगाव शहर महापालिकेकडून प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या याद्यांमध्ये तब्बल १६ हजार नागरिकांची नावे दोन किंवा दोन पेक्षा अधिक वेळा आलेली आहेत. यामध्ये एका व्यक्तींचे नाव तर तब्बल १७ वेळा आलेले असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यात महापालिका निवडणुका येत्या कालावधीमध्ये होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील १९ प्रभागांमधील प्रारूप आरक्षण जाहीर झाले असून शहरातील सर्व १९ प्रभागातील प्रारुप मतदारांची प्रभाग निहाय यादी मनपा प्रशासनाने जाहीर केली आहे. या याद्यांवर हरकती व सुचना माविण्यात आल्या असून त्यांची पडताळणी महापालिकेच्या पथकांकडून करण्यात येत आहे. त्यासाठी प्रभाग निहाय पथक नियुक्त करण्यात आले आहेत. महापालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये तब्बल १६००० मतदारांची नावे दुबार, तिबार किंवा त्यापेक्षा अधिक वेळा आले आहे. शहरातील संपुर्ण याद्यांमध्ये एकुण ३३००० दुबार नावे आहेत.
शहरात ४ लाख ३८ हजार मतदार
जळगाव शहरात एकुण ४ लाख ३८ हजार ५२३ मतदारांची नोंद आहे. यामध्ये २ लाख २५ हजार ३०८ पुरुष मतदार असून २ लाख १३ हजार १७७ महिला मतदारांची संख्या आहे. तसेच ३८ मतदार इतर असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दि.१ जुलै २०२५ पर्यंत नोंदणी झालेल्या मतदारांना येणाऱ्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
















