मुंबई (वृत्तसंस्था) जगभरात येत असलेली कोरोनाची दुसरी लाट ही त्सुनामी असू शकते, आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर निष्काळजी राहून चालणार नाही, मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे या त्रिसुत्रीचा अवलंब केला पाहिजे. हे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळीचा सण प्रकाशपर्वाचा सण असल्याने प्रदुषण आणि गर्दी टाळून तो साधेपणाने आणि आनंदाने साजरा करावा असे सांगितले.
सुख समृद्धीसाठी उघडलेल्या आपल्या घराच्या दारातून कोरोनाला आतू येऊ देऊ नये असे आवाहन केले. मुख्यमंत्र्यांनी फटाक्यांवर बंदी घालून आपल्यावर आणीबाणी लादायची नसून परस्पर विश्वासातून आपल्याला पुढे जायचे आहे असेही म्हटले आहे. आज मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमाद्वारे राज्यातील जनतेशी थेट संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की,कोरोना संकटकाळात राज्यातील सर्व धर्मियांनी त्यांचे सण साधेपणाने साजरे करून शासनाला सहकार्य केले आहे. इथून पुढेही हे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी धूर आणि प्रदुषणामुळे आतापर्यंत कोरोना नियंत्रणासाठी आपण केलेले प्रयत्न आणि त्याला प्राप्त झालेले थोडे यश हे बेफिकीरीने वागून वाहून जाऊ शकते याकडे राज्यातील जनतेचे लक्ष वेधले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला प्रकाशपर्व दिपावलीच्या शुभेच्छा ही दिल्या आहेत. दिवाळीनंतरचे दिवस हे हिवाळ्याचे दिवस असल्याने आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की इटली, स्पेन, इंग्लंड, नेदरलँड सारख्या देशात कोरोनाची दुसरी जबरदस्त लाट आलेली दिसून येत आहे.काही ठिकाणी पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात हा विषाणु दुप्पट वेगाने वाढतो आहे. आपल्याला भारतात आणि महाराष्ट्रात ही दुसरी लाट येऊच द्यायची नाही त्यामुळे शिस्तीचे पालन आवश्यक आहे. कोरोनाशी लढतांना आपण राज्यभर जम्बो आरोग्य सुविधा उभ्या करत आहोत, आपले डॉक्टर, नर्सेस आणि इतर कोविड योद्धे ही आपल्यासाठी गेली कित्येक महिने अथक् परिश्रम घेत आहेत असे म्हटले आहे.