जळगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्र कुलसचिव डॉ. एस आर भादलीकर यांनी कर्मचाऱ्यांची गोपनीय माहिती त्रयस्थ व्यक्तीला दिल्यामुळे त्यांच्या राजीनाम्यासाठी काल कर्मचारी कृती समितीने घेतलेल्या आक्रमक पवित्र्याला यश मिळाले आहे. अखेर भादलीकर यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.
पदनामबदल केलेले शासन निर्णय शासनाने रद्द केल्यामुळे बाधीत कर्मचारी व अधिकारी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली असून, त्यामध्ये स्वतः डॉ. एस. आर. भादलीकर हे देखील बाधित आहेत. अशा परिस्थितीत कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची गोपनीय माहिती आवश्यकता नसतांना व लेखी स्वरुपात कुठलीही मागणी नसतांना विद्यापीठाचे प्र. कुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकर यांनी सुयश दुसाणे, प्रशासन अधिकारी, शिक्षण संचालक कार्यालय, पुणे यांना लेखी स्वरुपात माहिती पाठविली. यामुळे गोपनीयतेचा भंग झाल्याने कर्मचारी कृती समितीने यावर तीव्र आक्षेप घेतला. याबाबत प्रभारी कुलगुरू ई. वायूनंदन यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी कारवाईचे आश्वासन देऊनही कारवाई करण्यात आली नाही.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या विद्यापीठातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सोमवारी आणि मंगळवारी आंदोलन केले. कालच्या आंदोलनानंतर प्रभारी कुलगुरू ई. वायूनंदन यांनी याप्रकरणी कार्यवाहीचे आश्वासन दिले. या अनुषंगाने आज प्रभारी कुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे कर्मचारी कृती समितीच्या आंदोलनाला यश आल्याचे दिसून आले आहे.