अमळनेर (प्रतिनिधी) कौटुंबिक नातेसंबंधामध्ये प्रत्येक नाते जिव्हाळ्याचे असते. मात्र, या क्रूर काळाने नात्यांवर एकाच वेळी आघात करून मामा- भाची व ‘त्या’ मामाच्या शालकावर एकाच दिवशी अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ आणली. एकाच दिवशी तिघांची अंत्ययात्रा निघाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
मंगरूळ (ता. अमळनेर) येथील रहिवासी तथा ग. स. सोसायटीचे माजी चेअरमन झांबर राजाराम पाटील (वय ७९) यांचे बुधवारी पहाटे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्याच वेळी इकडे मृत पाटील यांच्या भाची व अमळनेर येथील श्रीकृष्ण कॉलनीतील रहिवासी रत्नप्रभा भरत पाटील (वय ६४) यांचे बुधवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. मामानंतर भाचीचे निधन झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली. हेच कमी होते की काय? क्रूर काळाने मामा- भाचीच्या नात्यानंतर त्या मामाच्या निधनानंतर मेव्हणे- शालक या नात्यावर पण हल्ला चढवला. मृत पाटील यांचे शिंदगव्हाण (जि. नंदुरबार) येथील शालक ताराचंद पितांबर पाटील (वय ६५) यांचेही निधन झाले.
झांबर पाटील यांच्यावर दुपारी तीनला मंगरूळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, २ मुली नातवंडे असा परिवार आहे. ते ग.स.चे अमळनेर शाखेचे कर्मचारी किशोर पाटील यांचे वडील होते. दरम्यान, रत्नप्रभा पाटील यांची सायंकाळी सातला यांच्यावर गुलमोहर कॉलनीतील घरापासून अंत्ययात्रा निघाली. त्यांच्या पश्चात २ मुले, २ मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या माजी नगरसेवक तथा ग. स. कर्मचारी बाळराजे पाटील यांच्या आई होत. मामाची अंत्ययात्रा येथून ५ किलोमीटर अंतरावरील मंगरूळ गावातून दुपारी तर भाचीची अंत्ययात्रा सायंकाळी सातला अमळनेरातून तर झांबर पाटील यांच्या शालकांची देखील शिंदगव्हाण येथून अंत्ययात्रा निघाली. एकाच दिवशी एकाच नाते संबंधात तीन अंत्ययात्रा निघण्याचा हा पहिलाच कटू प्रसंग आला.