लातूर (वृत्तसंस्था) पिण्यासाठी पैसे देण्यास आईने नकार देताच चिडलेल्या २३ वर्षीय दारूड्या मुलाने आईच्या डोक्यात उखळातील लोखंडी ठोंबा घालून तिचा निर्घृण खून केला असल्याची घटना अहमदपूर तालुक्यातील सताळा येथे शुक्रवारी (दि. २२) रात्री घडली. संगीता नाथराव मुंडे (वय ४० रा. सताळा, ता. अहमदपूर) असे मारहाणीत मयत झालेल्या आईचे तर ज्ञानेश्वर नाथराव मुंडे (वय २३), असे आरोपी मुलाचे नाव आहे.
ज्ञानेश्वरचे माध्यमिक शिक्षण अर्धवटच झाले आहे. सध्या तो शेतीत काम करतो. मित्रांच्या संगतीने तो दारुच्या आहारी गेला आहे. नदीच्या बाजूला असलेल्या शेतात त्यांचे घर आहे. त्या ठिकाणीच तिघेही राहत होते. आई, बडील व आरोपी ज्ञानेश्वर हा मुलगा राहतात, त्याचा छोटा भाऊ कृष्णा हा पुणे येथे एका खाजगी कंपनीत कामाला आहे. शुक्रवारी (दि.२२) सकाळीच वडील नाथराव त्र्यंबक मुंडे हे परळी येथील वैद्यनाथाचे दर्शन घेऊन तेथेच नातेवाईकांकडे मुक्कामाला थांबले होते.
ज्ञानेश्वर हा दारूच्या आहारी गेल्याने त्याला कोणीही मुलगी देत नसल्याने तो अविवाहित आहे. शुक्रवारी (दि.२२ रात्री शेतातील घरात आई संगीता व मुलगा ज्ञानेश्वर हे दोघेच होते. दारुची सवय जडलेल्या ज्ञानेश्वर चाला दारू पिण्याची इच्छा झाली. नुकतीच म्हैस विकल्याने घरात आईकडे पैशाची मागणी केली. तेव्हा ‘माझ्याकडे पैस नाहीत’ म्हणताच घरात ठेवलेल्या डब्यातील डाळ व इतर जीवनोपयोगी साहित्य तो विक्रीसाठी घेऊन जात होता. घरातील किराणा साहित्य घेऊन जाण्यास आईने त्याला विरोध केला. तेव्हा रागाच्या भरात उखळात कुटण्यासाठी वापरण्याचा लोखंडी ठोंबा आईच्या डोक्यात मारून तिला गंभीर जखमी केले. आई रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली, तरीही तिचा कोणताही विचार न करता ज्ञानेश्वर याने घरातील कुलर वेगात चालू केले. ते तसेच सुरू ठेवून त्याने घर बंद केले. दरवाजाला बाहेरून कडी लावली. साहित्य घेऊन तो पळून गेला.
गावातील सुनील मुंढे यांच्या घरी कार्यक्रम असल्याने कार्यक्रमाला बोलवण्यासाठी दोघे मुले ज्ञानेश्वर याच्या घराकडे आली होती. तेव्हा घराला बाहेरून कडी लावलेली असताना आत कूलर चालू कसे, असे म्हणून त्या दोन मुलांनी दरवाजाची कड़ी काढून पाहिली, तर आत संगीता मुंडे या रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या दिसून आल्या. तत्काळ परिसरातील लोक जमा करून त्यांना सताळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून पुढील हलविण्यात आले. लातूर येथील दवाखान्यात डॉक्टरांनी तपासले तेव्हा त्यांना मृत घोषित करण्यात आले.
ज्ञानेश्वर याने यापूर्वी आईला पैशासाठी अनेकवेळा मारहाण केली होती. त्यावेळी नातेवाईकांनी समजून सांगितल्याने पोलिसात तक्रार करण्यात आली नव्हती. या प्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर याचे वडील नाथराव मुंडे यांच्या फिर्यादीवरून किनगाव पोलीस ठाण्यात मुलगा ज्ञानेश्वर मुंडे यांच्या विरोधात गुरन ३१३/२३ कलम ३०२ भादविप्रमाणे शुक्रवारी (दि.२२) रात्री उशीरा दाखल करण्यात आला. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत यांनी भेट देऊन आरोपी ज्ञानेश्वर याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास किनगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे हे करीत.