नांदेड (वृत्तसंस्था) नांदेड येथील पत्रकार दत्ताहरी धोत्रे यांचे सुपुत्र सुमित् धोत्रे याने युपीएससी ६६० रँक घेवून यश मिळविले. सुमीत यांचे वडील मागील अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करतात. तर आई एका खाजगी शाळेवर मुख्याध्यापिका आहे. सुमित धोत्रे याने पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली आहे.
नांदेड शहरातील विजयनगर परिसरात वास्तव्य करणाऱ्या सर्वसाधारण कुटुंबातील सुमित धोत्रे या युवकाचे दैदीप्यमान यश अनेक तरुणांना प्रेरणा देणारे आहे. सर्वसाधारण कुटुंबातून येऊन बिकट परिस्थितीशी दोन हात करून सुमितने यश खेचून आणलंय. सुमित धोत्रेचे वडील दत्ताहरी धोत्रे हे पत्रकारिता करतात. तर आई सुर्यकांता दत्ताहरी धोत्रे ह्या नांदेड येथीलच एका खासगी शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.
सुमितचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे नांदेड शहरातील टायनी एंजेल्स या खासगी शाळेत झाले. सुमितने त्याच्या शैक्षणिक आयुष्यात दिवसागणिक यथोचित यश संपादित केले आहे. ज्यात तो दहाव्या इयत्तेत असताना १०० टक्के गुण संपादित केले होते. तर राज्यातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून तो सर्वप्रथम होता. त्याचप्रमाणे त्याला केंद्र सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल मेरिट अवार्ड मिळून १२ वी पर्यंतचे त्याचे शिक्षण केंद्र सरकारच्या योजनेतून पूर्ण झाले आहे.
सुमितचे UPSCच्या तिन्ही परीक्षेत घवघवीत यश
त्यानंतर सुमित हा १२ नंतर JEE मेन्स परीक्षेत टॉपर राहिला आहे. तर बारावीनंतर सुमितने खडकपूरहून बीटेक केलेय. तर हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुमितने एका खासगी कंपनीत काही महिने नोकरी केली. पण त्यात तो रमला नाही कारण IAS चे स्वप्न त्याला खुणावत होतं. त्यामुळे ती भरघोस पगाराची नोकरी सोडून त्याने IAS चा ध्यास घेत घरापासून दूर दिल्ली येथे राहून UPSC चा अभ्यास सुरू केला आणि पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून देण्यात येणारी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, इंडियन पोलीस सर्व्हिस, ऍडमिनिस्ट्रेटीव सर्व्हिस ह्या तिन्ही परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. सुमितच्या यशात त्याचे शिक्षक व आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांचे मोठे योगदान असल्याची माहिती सुमितने दिली आहे.