जळगाव (प्रतिनिधी) येथील महाबळ परिसरामध्ये सावत्र बापाने मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम बापाला रात्री उशीरा अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील महाबळ परिसरात राहणाऱ्या वास्तव्यास असलेल्या विवाहीतेचे दुसरे लग्न झाले असून पहिल्या लग्नापासून असलेली मुलगी मोठी झाली आहे. नात्याने बाप असलेल्या तिच्या नराधम पतीने मुलीवर अत्त्याचार सुरु केला हेाता. पिडीतेवर फेब्रुवारी २०१९ पासून वेळोवेळी जबरदस्ती अत्याचार केले. आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराबाबत पीडितेने आजी (वडिलांची आई) ला कळविले. मात्र, तिने देखील दुर्लक्ष करीत अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला पाठीशी घालण्याचे काम केले. पीडित मुलीच्या आईला घडलेल्या प्रकाराबाबत कल्पना आल्याने तिने तिला पुणे येथे आपल्या आई वडिलांकडे पाठविले. मात्र नराधम सावत्र बापाने तरूणीला वारंवार मेसेज पाठवून, कॉल करून पुन्हा जळगावी बोलवत होता. जळगावला न आल्यास पीडित तरुणीच्या आईला व लहान बहिणीला त्याने त्रास देण्यास सुरुवात केली. आपल्या आई बहिणीवर होत असलेल्या अन्यायाला कंटाळून पीडित मुलीने आजी-आजोबांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी पुण्यातील एका सामाजिक संस्थेच्या मदतीने पुणे पोलिसात गुन्हा दाखल केला. नराधम बाप आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या आजी विरुद्ध दाखल गुन्हा रामानंद नगर पोलीसात वर्ग करण्यात आला. त्यानंतर नराधम बापास रात्री उशीरा अटक करण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम पाटील करीत आहे.















