मुंबई (वृत्तसंस्था) केंद्र सरकारकडे कोरोना रोखण्यासाठी कोणतंही धोरण नाही. नियोजन नाही. सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करून कोरोना रोखण्यासाठी टास्क फोर्स नेमावी लागते. असा हल्लाबोल काँग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेऊन हा संतप्त सवाल केला आहे. केंद्र सरकारकडे कोरोना रोखण्यासाठी कोणतंही धोरण नाही. नियोजन नाही. सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करून कोरोना रोखण्यासाठी टास्क फोर्स नेमावी लागते. मग केंद्र सरकार करतंय काय?, असा सवाल थोरात यांनी केला आहे. कोरोनाची संपूर्ण जबाबदारी घेऊन प्लानिंग करायला कोर्ट सांगत आहे. पण केंद्र जबाबदारी घेत नाही. सर्व जबाबदाऱ्या राज्यांवर ढकलून देत आहेत. आज देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याला केंद्र सरकारच जबाबदार आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.
देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना कुंभमेळा आणि निवडणुका घेतल्या गेल्या. त्यामुळे कोरोनाचा स्फोट झाला. त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे. त्याचे परिणाम देश भोगत आहे. कोरोना वाढवण्यात देशाचं नेतृत्व जबाबदार आहे. त्याचे परिणाम देश भोगत आहे, असं सांगतानाच देशाचं लसीकरण होण्याआधीच लस निर्यात करणं हा केंद्र सरकारचा दांभिकपणा होता, अशी खरमरीत टीकाही त्यांनी केली.
‘मराठा आरक्षणाबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत’
मराठा आरक्षणा बद्दल राज्य सरकार म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. याबद्दल अधिक माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण देतील. पण आरक्षण बद्दल आम्ही सरकार म्हणून काय करता येईल हे पाहत आहोत, असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. तसेच राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांची प्रकृती उत्तम आहे. ते आता कोविडमधून बाहेर पडले आहेत, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.