पाचोरा (प्रतिनिधी) यात्रेत तमाशाचा फड सुरु असलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर मनोज ज्ञानेश्वर निकम (वय २६, रा. हनुमंतखेडे ता. सोयगाव जि. छत्रपती संभाजीनगर) या तरुणाचा संशयास्पदरित्या मृतदेह मिळून आला होता. या तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं !
पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा गावाजवळील बदरखे येथे सुरु असलेल्या पेमबुवा महाराजांची यात्रोत्सवानिमित्त तमाशाचा फड सुरु होता. तमाशा बघण्यासाठी आलेल्या असलेल्या मनोज निकम या तरुणाचा काही अंतरावर संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. परंतु मनोज निकम यांच्या अंगावर मारहाणीच्या जखमा असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी मनोज यांच्यासोबत घातपात झाला असल्याचा आरोप केला होता. तसेच त्यांनी मनोज यांच्या मृतदेहाचे इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी केल्याने सोमवारी त्यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. तसेच मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याच्या पावित्र्यात होते.
अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल !
मनोज निकम यांच्या मृत्यू प्रकरणी नंदकिशोर पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुल खताळ हे करीत आहे. संशयितांना चौकशीसाठी घेतले ताब्यात ज्याठिकाणी मनोज निकम यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी मनोज यांच्यासोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे याठिकाणाहून काही संशयितांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी करण्यात आली.