लातूर (वृत्तसंस्था) तुम्ही-आम्ही भाग्यवान आहोत. कारण आपण दुसऱ्या लाटेतून वाचलो आहोत. तुमचा आणि आमचा जन्म नाही, तर पुनर्जन्म असल्याचं विधान ज्येष्ठ कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Kirtankar Indurikar Maharaj) यांनी केलं आहे. आता तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच, असं ते म्हणाले. लातूरमध्ये आयोजित कीर्तनात बोलताना त्यांनी हसत हसत जगा असा उपदेशही दिला.
ते म्हणाले की, “डॉक्टरच गेले तर हॉस्पिटल कोण चालवेल? हॉस्पिटल विकत घेणारे गेले, डॉक्टर महिन्याला ठेवणारे गेले,” असं यावेळी त्यावेळी सांगितली. यमानं जर लाच घेतली असती, तर यांनी यमालाही चेक पाठवला असता. पण यमानं लाच घेतली नाही असं त्यांनी सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. गाईला पाजलेलं पाणी, तुळशीला घातलेलं पाणी, वारकऱ्याची आणि काळ्या आईची केलेली सेवा कधी वाया जात नाही. आपण कधीतरी गाईला पाणी पाजलंय, तुळशीला पाणी घातलंय, कधीतरी आपण वारकऱ्याच्या पाया पडलोय, कीर्तनकाराच्या पुढे वाकलोय…ते पुण्य आपल्याला २०२१ मध्ये कामाला आलं. त्यामुळे हसत हसत जगा. आता भांडणं करण्यात मजा नाही. गळ्यात हात घालून फिरण्याची गरज नाही,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.
पुढे ते म्हणाले की, “आता सगळं क्षणिक आहे. उद्याचं किर्तने होईल का याची शाश्वती नाही. आता खोकला का ठोकला, असा जीआरच देवानं काढलाय. काही लोकं खोकला दाबून मेली, पण खोकली नाहीत. त्यामुळे आनंदानं, हसत हसत जगा”.
“दीड वर्ष काय लक्षात कुठे राहिलंय? ८० टक्के भजनं, हरिपाठ विसरले. ४० टक्के किर्तनकारच हरिपाठ विसरले. उत्पन्नच नाही तर हरिपाठ करुन काय करायचं? ४० टक्के माळकऱ्यांनी माळा काढल्या. अंडे खाल्यावर कोरोना होत नाही कोणीतरी सांगितलं आणि वांगी सोडून अंडी खायला लागले. टीव्हीला माळकऱ्यांना पाच हजार मिळणार असल्याची बातमी आली आणि पुन्हा माळ घातली. पण तिसरी लाट ही फक्त माळा काढणाऱ्यांसाठीच असणार,” असं इंदुरीकर महाराज म्हणाले. यावेळी त्यांनी मन खंबीर ठेवणं हेच कोरोनावरील औषध असल्याचं म्हटलं.