नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहा:कार माजवलेला असतानाच आता कोरोनाची तिसरी लाट देशात येणार आहे. येत्या ६ ते ८ आठवड्यात देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असून ही लाट रोखणं अशक्य असेल, असा इशारा एम्स रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे.
यावेळी त्यांनी डेल्टा प्लस विषाणूसंबंधी बोलताना विषाणूंच्या परिवर्तनाचा पुढील अभ्यास करण्यासाठी कोरोनाविराधातील लढाईत नव्याने रुपरेषा आखण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. “आपण अनलॉक करत असताना पुन्हा एकदा लोकांकडून कोरोनासंबंधित सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन केलं जात आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपासून आपण धडा घेतलेला दिसत नाही. पुन्हा एकदा गर्दी होत आहे, लोक एकत्र येत आहेत. राष्ट्रीय स्तरावर रुग्णसंख्या वाढण्यास काही वेळ लागेल. पण तिसरी लाट अपरिहार्य असून पुढील सहा ते आठवड्यात येऊ शकते…जास्त काळही लागू शकतो,” असं यावेळी रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं आहे.
दरम्यान यावेळी त्यांनी आपण गर्दी रोखण्यासाठी तसंच कोरोनासंबंधी सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्यासंबंधी काय भूमिका घेतो यावर सगळं अवलंबून असल्याचं स्पष्ट सांगितलं आहे. देशातील पाच टक्के लोकसंख्येला दोन्ही डोस मिळाले असून लसीकरण पूर्ण झालं आहे. वर्षअखेरपर्यंत १०८ कोटी लोकसंख्येचं लसीकरण करण्याचं केंद्र सरकारचं लक्ष्य आहे.
“भारतात पहिल्या लाटेत व्हायरस इतक्या वेगाने पसरत नव्हता. दुसऱ्या लाटेत हे सगळं बदललं आणि व्हायरस जास्त संसर्गजन्य झाला. आता डेल्टा व्हायरस जास्त संसर्गजन्य असून वेगाने पसरत आहे,” असं यावेळी त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेत आठ लाख अॅक्टिव्ह रुग्ण असतील असं तज्ज्ञांनी सांगितलं असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
लसीकरण मुख्य आव्हान
“लसीकरण हे मुख्य आव्हान आहे. नवी लाट तीन महिन्यांचा कालावधी घेऊ शकते, पण इतर गोष्टींवर अवलंबून असल्याने ही वेळमर्यादा कमीदेखील होऊ शकते. कोरोनासंबंधित नियमांसोबतच लक्ष ठेवणंही महत्वाचं आहे. गेल्यावेळी नवा विषाणू जो बाहेरुन आला आणि येथे विकसित झाला यामुळे येथे मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली. हा विषाणू सतत बदलत राहणार आहे. हॉटस्पॉटच्या ठिकाणी आक्रमकपणे काम करण्याची गरज आहे,” असं रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं आहे.