धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव-जळगाव रोडवरील जीएस कॉटन जिनिंगजवळ सायकलस्वाराला भरधाव ट्रकने धडक दिली होती यात सायकलस्वार वृद्धाचा मृत्यू झाला होता. दरम्यान, वृद्धाला चिरणारा ट्रक हा अवैध वाळू वाहतूक करणाराच आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात ट्रक चालकाविरुद्ध स्वतंत्र दोन गुन्हे दाखल आहे.
दिनांक 6 मार्च 2025 रोजी सायंकाळी 7:45 ला धरणगाव-जळगाव रोडवरील जीएस कॉटन जिनिंग जवळ सायकलस्वाराला समोरून येणाऱ्या भरधाव ट्रक (क्रमांक MH 04 FJ 8083) चालक गणेश पंडित पवार (रा. बांभोरी, प्र. चा. ता. धरणगाव) याने धडक दिली. यात दत्तात्रय शंकर पाटील (वय 65 राहणार खत्री गल्ली धरणगाव) यांच्या डोक्याला व इतर ठिकाणी गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी दत्तात्रय पाटील यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक 6 मार्च 2025 रोजी रात्री 9:46 वाजता धरणगाव पोलीस स्थानकात गणेश पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रक चालकाविरुद्ध त्याच दिवशी दुसरा गुन्हा दाखल
दरम्यान, दिनांक 6 मार्च 2025 रोजी रात्री 11 वाजून 54 मिनिटांनी धरणगाव पोलिसात गणेश पवार यांच्याविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धरणगाव मंडळ अधिकारी भरत रमेश पारधी (वय 38, राहणार योगेश्वर नगर, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक 6 मार्च 2025 रोजी गणेश पंडित पवार याने त्याच्या ताब्यातील टाटा क्रमांक MH 04, FJ8083 या ट्रकमध्ये अवैध वाळू वाहतूक करत होता. यादरम्यान रस्त्यात अपघात करून गणेश पवार ट्रक जागीच सोडून फरार झाला.