अमळनेर (प्रतिनिधी) पिसाळलेल्या दोन कुत्र्यांनी एका दोन वर्षांच्या बाळाला घरसमोरून उचलून नेत त्याचे लचके तोडल्याची धक्कादायक घटना दि. ८ रोजी देशमुखनगरमध्ये घडली. सुदैवाने एका महिलेच्या लक्षात वेळीच हा प्रकार आल्याने त्या बाळाचा जीव वाचला.
या संदर्भात अधिक असे की, सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास देशमुखनगरमध्ये प्रांशू ओजस सूर्यवंशी (वय २ वर्षे) हा चिमुकला आपल्या घराच्या अंगणात खेळत होता. त्यावेळी अचानक दोन पिसाळलेले कुत्रे आले आणि त्याला ओढून नेत त्याचे लचके तोडण्यास सुरुवात केली. यामुळे मुलगा जीवाच्या आकांताने रडायला लागला. त्याचा आवाज येताच तेथे असलेल्या संगीता पवार यांनी प्रांशूकडे धाव घेतली आणि त्याची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली.
यानंतर प्रांशूला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू अमळनेरमध्ये अॅन्टी रेबिज सिरमचे (एआरएस) इंजेक्शन उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्याला उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे त्याला एआरएस इंजेक्शन देण्यात आले. दरम्यान, बाळाच्या अंगावर अनेक खोल जखमा आहेत. त्याची प्रकृती गंभीर झाली होती. परंतू आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याचे कळते.