नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने नुकतीच ‘एकीकृत पेन्शन योजना’ अर्थात ‘यूपीएस’ची घोषणा केली आहे; परंतु यामधील ‘यू’ म्हणजे मोदी सरकारचे ‘यू-टर्न’ आहे, असा टोला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी लगावला आहे. तर, कर्नाटकात भाजपने ऑपरेशन लोटस सुरू केले असून काँग्रेसच्या आमदारांना १०० कोटी रुपये देण्याचे प्रलोभन दाखवले जात असल्याचा खळबळजनक आरोप पक्षाचे आमदार रविकुमार गौडा यांनी केला.
केंद्रीय मंत्रिमंडळाने १ जानेवारी २००४ नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी वेतनाच्या ५० टक्के पेन्शन देण्यास मंजुरी दिली. राष्ट्रीय पेंशन प्रणाली (एनपीएस) अंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांचा अधिकार देण्यास सरकारने हिरवा कंदील दाखवला. आगामी हरियाणा व जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत एकीकृत पेन्शन योजनेवर (यूपीएस) मोहोर उमटवण्यात आली. या मुद्यावरून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विटरवरून म्हटले की, ‘यूपीएस’ मधील ‘यू’चा अर्थ ‘यू-टर्न’ असा आहे.
गेल्या ४ जूननंतर जनतेची शक्ती पंतप्रधानांच्या सत्तेच्या अहंकारावर वरचढ ठरली आहे. म्हणूनच केंद्र सरकारने भांडवली लाभ व निदेशांकीकरणाविषयी अर्थसंकल्पातील पाऊल मागे घेतले आहे. त्यानंतर, वक्फ विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीस) पाठवले. तसेच प्रसारण विधेयक व ‘लॅटरल एंट्री’ मागे घेण्यात आली. म्हणून मोदी सरकार हे ‘यू-टर्न’ सरकार बनले आहे, असा टोला खरगे यांनी लगावला. आम्ही उत्तरदायित्व निश्चित करत राहू आणि १४० कोटी भारतीय जनतेला केंद्रातील निरंकुश सरकारपासून वाचवत राहू, असे खरगे म्हणाले. तर, भाजपचे नेते रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर जोरदार पलटवार केला. काँग्रेस सध्या यूपीएसला विरोध करीत आहे.