गोंडा वृत्तसंस्था । एका गायीच्या वासराला वाचवण्यासाठी विहिरीत उतरलेल्या 5 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उत्तर प्रदेशातील गोंडा येथे घडली. येथील एका कोरड्या विहिरीत एक गायीचे वासरू घसरून पडले होते. या वासराला वाचवावे या उद्देशाने 5 लोक त्या विहिरीत उतरले मात्र विहिरीतून उत्सर्जित होत असलेल्या विषारी वायूमुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्या या 5 लोकांपैकी चौघे एकाच कुटुंबातील आहेत. या घटनेची माहिती मिळताच पालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने या पाच जणांचे मृतदेह बाहेर काढले.
हे पाच लोक गायीच्या वासराला वाचवण्यात यशस्वी झाले, मात्र ते स्वत:चा प्राण वाचवू शकलेले नाहीत.विशेष म्हणजे विहिरीत पडलेले हे वासरू या पाच जणांपैकी कोणाचाही नव्हता, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही घटना गोंडा येथील महाराजगंज चौकीच्या राजा मोहल्ला येथे घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांमध्ये वैभव (वय-18), दिनेश उर्फ छोटू (वय-30) रविशंकर उर्फ रिंकू (वय-36) आणि विष्णु दयाल (वय-35) यांचा समावेश आहे. हे चौघे एकाच कुटुंबातील आहेत. तर मन्नू सैनी (वय-35) हा भदुआ तरहर परिसरातील रहिवासी होता.
पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, दिनेश आणि रविशंकर हे दोघे भाऊ होते आणि आपल्या कुटुंबासाठी तेच कमावते होते. विष्णु हा दिनेश आणि रवी यांचा चुलत भाऊ होता. तर वैभव देखील त्यांच्या कुटुंबातीलच होता. हे सर्व तरूण भाजी आणि फळे विकून आपल्या परिवाराचा पालन पोषण करत होते, अशी माहिती गोंडाचे पोलिस अधीक्षक राजकरण नय्यर यांनी सांगितले.ही घटना मंगळवारी दुपारी 3 च्या सुमारास घडली.