नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरु झाली आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी मिळेल. त्यानंतर संसदेत डिजीटल माध्यमातून बजेट सादर होईल. निर्मला सीतारमण यांच्या हातात आज खातेवहीऐवजी टॅब दिसला. देशातील हे पहिलं डिजीटल बजेट आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन सकाळी ११ वाजता सर्वसाधारण अर्थसंकल्प संसदेत सादर करतील.
अवघ्या तासाभरात देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. केंद्र सरकारने पेपरलेस कारभार करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच पेपरलेस अर्थसंकल्प सादर होणार आहे. मेड इन इंडिया टॅबद्वारे अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. खासदारांनाही पेन ड्राईव्हमध्येच यंदाचा बजेट देण्यात येणार असून आत्मनिर्भर भारताच्या दिशेने उचललं गेलेलं हे पाऊल आहे. कोरोना संकटामुळे सरकारने पेपरलेस बजेटची घोषणा केली होती. त्यामुळे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच बजेटची कॉपी छापण्यात आलेली नाही. मोदी सरकारने देशात डिजिटलीकरणावर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजचा बजेट पाहिला जात आहे. कोरोना महामारी, अर्थव्यवस्थेचे रुतलेले चाक आणि बेरोजगारीचा गंभीर प्रश्न या सर्व समस्यांवर उपाय म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.