नंदुरबार (प्रतिनिधी) चारित्र्यावर संशय घेऊन रोजच्या त्रासाला कंटाळून पत्नीने पतीच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना धडगाव तालुक्यातील तेलखेडी वाडवईपाडा येथे घडली. केशव जोरदार पावरा (वय २९), असं मयताचे नाव आहे. तर सुतीबाई केशव पावरा (वय २५), असे संशयित पत्नीचे नाव आहे.
धडगाव तालुक्यातील तेलखेडी वाडवईपाडा येथील केशव पावरा व पत्नी सुतीबाई पावरा यांच्यात नेहमी वाद होत होते. केशव पावरा दारुच्या नशेत पत्नी सुतीबाई पावरा हिच्या चारित्र्यावर नेहमीच संशय घेत होता. त्यामुळे पतीच्या दररोजच्या जाचाला कंटाळून संशयित सुतीबाई पावरा हिने बुधवारी (दि. ११) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास केशव पावरा घरात असताना कुन्हाडीने डोक्यावर वार करून त्याला जिवेठार केले.
यावेळी केशव व सुतीबाई पावरा यांची मुले घरातच होती. त्यांनी घडलेली घटना शेजाऱ्यांना सांगितली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी केशव पावरा याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचे दिसून आले. दरम्यान, धडगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. या प्रकरणी मृत केशव पावरा याचा भाऊ विजय जोरदार पावरा याच्या फिर्यादीवरुन सुतीबाई पावरा हिच्याविरोधात धडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक प्रविण महाले तपास करीत आहेत. याबाबतचे आज ‘पुण्य नगरी’ने दिले आहे.