चेन्नई (वृत्तसंस्था) पती आणि पत्नीचे नाते हे विश्वासाचे आणि एकमेकांना सांभाळून घेण्याचे मानले जाते. पण काही ठिकाणी स्वार्थापायी या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना तामिळनाडूमध्ये घडली आहे. पतीच्या विम्याचे तीन कोटी रुपये मिळावेत म्हणून पत्नीने तिच्या चुलत भावाच्या मदतीने पतीला कारमध्ये जाळून टाकले. सोबतच हा केवळ एक जळीतकांड असल्याचा बनाव तिने रचला.
तामिळनाडूतील इरोड जिल्ह्यातील पेरुन्दुरई गावात राहणाऱ्या ६२ वर्षीय रंगराजन यांचा कारमध्ये जळून मृत्यू झाला. रंगराजन हे पॉवरलूम आणि रिअल इस्टेटचा व्यवसाय करत होते. काही दिवसांपूर्वी ते एका अपघातात जखमी झाले. त्यांच्यावर कोइम्बतूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारांनंतर रंगराजन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना ओमणी कारने घरी नेण्यात येत होते. त्यांची ५५ वर्षीय पत्नी ज्योती मणी आणि तिचा ४१ वर्षीय चुलत भाऊ राजा हे सोबत होते. त्यांनी रंगराजन यांना गाडीतच पेटवून दिले आणि गाडीला आग लागल्याचा बनाव केला. तसेच कर्ज मिटवण्यासाठी माझी हत्त्या करा आणि विम्याच्या रकमेमधून कर्ज मिटवून टाका असे रंगराजन यांनी त्यांच्या पत्नीला सांगितल्याचे, पत्नीने बनाव उघड पडल्यानंतर सांगितले. पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली बहीण-भावाला तुरुंगात पाठवले आहे.