लातूर (वृत्तसंस्था) वडिलांचा डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा मारून आणि नाका-तोंडावर उशी दाबून खून केल्याचा प्रकार पोलीस चौकशीत उघड झाला आहे. दरम्यान, आईसह मुलांनी तोल जाऊन दुसऱ्या मजल्यावरुन पडून वडिलांचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला होता. परंतू शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर खून झाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी पत्नीसह दोन मुलांना अटक केली आहे. दरम्यान, सतत दारू पिऊन आईला त्रास देत असल्यामुळे वडिलांना मारल्याची धक्कादायक कबुली आरोपींनी पोलीस चौकशीत दिली आहे.
या संदर्भात अधिक असे की, व्यंकट नारायण मरलापल्ले (४८, रा. ढाळेगाव, ता. अहमदपूर) यांचा रविवारी मध्यरात्री घराच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीतून थुंकण्यासाठी गेल्यानंतर त्यांचा तोल गेल्याने खाली पडून मृत्यू झाल्याची माहिती मयताचा मुलगा सुरज मरलापल्ले याने पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. परंतू शवविच्छेदन अहवालात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने व्यंकट मरलापल्ले यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते. त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि त्यांनी तपासचक्र फिरवायला सुरुवात केली.
अखेर पोलीस तपासात समोर आले की, घटनेच्या रात्री वाद झाल्यानंतर तिघांनी मिळून व्यंकट मरलापल्ले हे 7 मे रोजी रात्री झोपेत असताना त्यांच्या बेडरुममध्ये जात रामेश्वर याने कुऱ्हाडीच्या लोखंडी दांड्याने डोक्यात मारले. तर राधाबाई यांनी पाय धरले आणि सुरज याने छातीवर बसून दोन्ही गुडघ्याने हात दाबले. त्यानंतर दोन्ही हाताने जिव जाईपर्यंत नाक व तोंड दाबून धरत व्यंकट मरलापल्ले यांचा खून केला. एवढेच नव्हे तर खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह घरावरून फेकून देत घरावरून पडून मृत्यू झाल्याचा बनाव निर्माण केला. याप्रकरणी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र गोखरे यांच्या फिर्यादीवरून आई व दोन मुलांविरुद्ध कलम ३०२, २०१,३४ भादंविप्रमाणे किनगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघां संशयितांना अटक करण्यात आली आहे. सतत दारू पिऊन आईला त्रास देत असल्यामुळे वडिलांना मारल्याची धक्कादायक कबुली आरोपींनी पोलीस चौकशीत दिली आहे. परंतू पोलीस तरी देखील सर्व बाजूने तपास करत आहेत.