अकोला (प्रतिनिधी) पिंजर पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या महान येथे विजेच्या धक्क्याने वृध्द दाम्पत्यांचा करुण अंत झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
७० वर्षीय वृध्द प्रभाकर बाप्पूराव जानोरकर आणि त्यांची ६५ वर्षीय वृध्द पत्नी महान येथे राहतात. प्रभाकर जानोरकर शेतीचे कामे करून सायंकाळी घरी पोहोचले. घराच्या खिडकीतून पाहिले असता, त्यांना वृध्द पत्नी घरातील कुलरजवळ जमिनीवर कोसळलेली दिसली. आजारी असलेली पत्नी अशा अवस्थेत पडल्याने प्रभाकर जानोरकर यांनी आरडा-ओरड करीत धावत पत्नीकडे पोहोचले. त्यांनी तिला जसे हात लावले तसे तेही कोसळले.
घरातील कुलरमध्ये विजेचा जिवंत प्रवाह आल्याने आधी पत्नीचा आणि नंतर वृध्द पतीचा मृत्यू झाला. आरडा-ओरड ऐकून येथे उदय जानोरकर आणि आशिष फोफळे पोहचले. त्यांनी वीज पुरवठा खंडीत करीत तातडीने दोघांनाही रूग्णालयात हलविले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोन्ही वृध्द दाम्पत्यांस मृत घोषित केले. एकाचं वेळी वृध्द दाम्पत्यांचा अपघाती घटनेत मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.