नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ओमिक्रॉन हा डेल्टापेक्षा तिप्पट वेगानं पसरतो असं आतापर्यंत तरी दिसून आलं आहे. पण तो किती घातक आहे यावर मात्र अजूनही चित्रं स्पष्ट होणं बाकी आहे. मात्र मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी आता इशारा दिला आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग जगभरात वेगाने पसरत आहे आणि नागरिक आता महामारीच्या आजाराच्या सर्वात वाईट टप्प्यात प्रवेश करू शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
काय म्हणालेत बिल गेटस?
बिल गेट्स यांनी मंगळवारी उशिरा ट्विट केलं. ‘आता सर्वकाही सामान्य होईल असे वाटत असताना आम्ही साथीच्या आजाराच्या सर्वात वाईट स्थितीत प्रवेश करणार आहोत. ओमिक्रॉन आपल्या सर्व घरांत प्रवेश करणार आहे. आपल्या जवळच्या मित्रांना कोरोनाचा संसर्ग होतोय. यामुळे आपण आपले बहुतेक सुट्टीचे प्लॅन रद्द केले आहेत, असं बिल गेट्स यांनी सांगितलं. जीवन संपवण्यापेक्षा सुट्टी संपवणे चांगले आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस एडनाम ग्रेब्येयियस यांनी आधीच सांगितले आहे.
अमेरिकेत ओमिक्रॉनचा संसर्ग वेगाने पसरत आहेत. आतापर्यंत ओमिक्रॉनची नवीन रुग्णांची संख्या ७३ टक्क्यांवर पोहोचली आहे. ‘ओमिक्रॉन वेरियंट आधीच्या कोरोना व्हायरसच्या वेरियंटपेक्षा अधिक वेगाने पसरत आहे. हा वेरियंट लवकरच जगातील प्रत्येक देशात थैमान घालणार आहे. ओमिक्रॉन तुम्हाला किती आजारी करू शकते हे अद्याप समोर आलेले नाही. याबद्दल अधिक माहिती येईपर्यंत आपण याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. ओमिक्रॉन हा डेल्टा वेरियंट कमी प्राणघातक दिसत असला तरी त्याच्या संसर्गामुळे करोना रुग्णांची संख्या उसळली आहे, असे गेट्स म्हणाले.















