भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील अंजनविहिरे गावात ३ दिवसांपूर्वी एक संतापजनक घटना घडली आहे. येथील शेतमालकासह सालदाराने दलित समाजातील एका अल्पवयीन मुलाला कैऱ्या तोडल्या म्हणून दोन तास झाडाला बांधून ठेवले. दरम्यान, शेतमालकाने त्या मुलाच्या अंगावर लघवी देखील केल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी भडगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून शेतमालकासह सालदारास पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत वृत्त असे की, शेतमालक गोपी रवींद्र पाटील व सालदार प्रवीण पावऱ्या अशी या घटनेतील संशयित आरोपींची नावे आहेत. पीडित अल्पवयीन मुलगा हा दलित समाजातील आहे. त्याचे कुटुंबीय उल्हासनगर येथे राहते. यावर्षी १२ वीच्या शिक्षणासाठी तो अंजनविहिरे येथे मामांकडे आलेला होता. ५ जून रोजी तो त्याच्या आजीची औषधी घेऊन गिरड गावातून घरी परत जात होता. रस्त्यात त्याने गोपी पाटील याच्या शेतातील झाडाच्या कैऱ्या तोडल्या. त्यावेळी सालदार प्रवीनने त्याला जाब विचारला. गोपीला त्याने फोन करून शेतात बोलावून घेतले. नंतर दोघांनी मुलाला मारहाण करत दोराच्या सहाय्याने झाडाला बांधले. यावेळी गोपीने त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला. तसेच त्याच्या पॅंटमध्ये व अंगावर लघवी केली. व्हिडिओ व्हॉट्सअपवर व्हायरल केला. पुन्हा कैऱ्या तोडायला आला तर हातपाय तोडण्याची धमकी दिली. या घटनेनंतर पीडित मुलाने घडलेला प्रकार मामा व आजीला सांगितला. नंतर दुसऱ्या दिवशी ६ जूनला याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून दोन्ही संशयित आरोपींना अटक झाली आहे.
















