नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एक अजब प्रकरण समोर आलं आहे. एका तरुणाने आपल्या आईच्या सख्ख्या बहिण अर्थात आपल्या मावशीसोबत लग्न केलं आहे. मावशीसोबत लग्न करणाऱ्या या तरुणाला प्रचंड विरोध करण्यात आला होता. परंतु कुटुंबीयांचा विरोध झुगारुन त्याने मावशीसोबत लग्नगाठ बांधली.
ही घटना झारखंडमधील चतरा येथील रक्सी या गावात घडली. या गावात राहणाऱ्या सोनू राणाने सख्ख्या मावशीसोबत लग्न केलं. १ वर्ष त्याचे आपल्या मावशीसोबत प्रेमसंबंध सुरु होते. अखेर त्याने हेरूआ नदीजवळील शिव मंदिरात प्रेमविवाह केला. सोनू जेव्हा लग्न करुन घरी आला तेव्हा कुटुंबीयांनी त्यांना प्रचंड विरोध केला. कारण आईच्या बहिणीला समाजात आईचा दर्जा दिला जातो. परिणामी या लग्नामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. आपल्याच आईचा दाजी बनलेल्या या तरुणाला पाहून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे.
घरी येताच या जोडप्याला कुटुंबीय पोलिसांत घेऊन गेले. तिथे त्यांनी हा विवाह मान्य करण्यास नकार दिला. परंतु प्रेमीयुगुल आपल्या निर्णयावर मात्र ठाम होतं. अखेर पोलिसांनी कुटुंबीयांना समजावून घरी पाठवलं. पोलीस ठाण्यातून आपली नवरी बनलेल्या मावशीला हा मुलगा घरी घेऊन गेला तेव्हा त्याच्या आईने रडून गोंधळ घातला. ती लोकांना आपल्या मुलाला समजवण्याची विनंती करत होती. गावातील लोकही या अनोख्या लग्नामुळे हैराण होते. मात्र घरातील लोक आणि गावकऱ्यांचा विरोध सहन करून या प्रेमी जोडप्याने सोबतच आयुष्य जगण्याचा निर्धार केला आहे.