अमरावती (वृत्तसंस्था) येथील एका तरुणानं मित्राच्या पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधातून (Immoral relationship) आपल्या जीवलग मित्राचा काटा काढला आहे. आरोपीनं मित्राला गावाबाहेर निर्मनुष्य ठिकाणी घेऊन जात गळा आवळून हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मित्राला अटक (Accused arrested) केली आहे. नरेश गणेश पवार असं अटक केलेल्या ३२ वर्षीय आरोपी मित्राचं नाव असून तो दुधाचा व्यवसाय करतो.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नरेशचं आपल्या मित्राच्या पत्नीसोबत (वय-३४) अनैतिक संबंध सुरू होते. मागील बऱ्याच दिवसांपासून मित्राच्या नजरेआड तरुणाचं हे काळ कृत्य सुरू होतं. पण अलीकडच्या काळात आरोपीच्या अनैतिक संबंधात मित्र अडसर ठरत होता. त्यामुळे त्यानं मित्राच्या हत्येचा कट रचला. तत्पूर्वी आरोपीनं विम्याचे पैसे हडप करण्यासाठी मित्राच्या जीवन विम्याचा साडेदहा हजारांचा हफ्ता देखील भरला. विम्याचा हफ्ता भरल्यानंतर दहा दिवसांनी आरोपीनं आपल्या जीवलग मित्राचा काटा काढला आहे. घटनेच्या दिवशी रात्री अकरा वाजता आरोपी नरेश हा मित्राला घेऊन गावाबाहेर निर्मनुष्य ठिकाणी घेऊन गेला होता. याठिकाणी गेल्यानंतर आरोपीनं बेसावध असलेल्या मित्राचा अचानक गळा आवळला. यातच त्याचा मृत्यू झाला.
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीनं तोंड उघडलं
दरम्यान, रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यानं कुटुंबीयांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध केली. पण त्यांचा काहीही थांगपत्ता लागला नाही. घटनेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांना थेट त्याचा मृतदेहच आढळला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता, आरोपी नरेश याचं मृताच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे अमरावती ग्रामीण पोलिसांच्या एलसीबी आणि कुऱ्हा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली. पण आरोपीनं सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली. पण पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीनं तोंड उघडलं आहे. त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.















