यवतमाळ (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील महागाव येथे एका तरुणीवर बिबट्याने हल्ला केला असता, त्या तरुणीने बिबट्यावरच प्रतिहल्ला केला आहे. बिबट्याच्या आणि तिच्या सुरु असलेल्या झटापटीत तिने बिबट्याच्या डोक्यावर चक्क कळशीने एका पाठोपाठ एक अनेक वार केले. या वारांमुळे बिथरलेल्या बिबट्याने तरुणीची मान जबड्यातून सोडून जंगलात बिबट्याने पोबारा केला आहे. तरुणीने हे धाडस दाखवले आणि तिचा जीव वाचला आहे.
संबंधित घटना यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील करंजखेड शिवारात घडली आहे. तर संबंधित मुलीचं नाव वृषाली नीळकंठराव ठाकरे असून ती करंजखेड येथील रहिवासी आहे. जखमी वृषाली ही फार्मसीची विद्यार्थिनी असून सोमवारी आईसोबत आपल्या शेतात कापूस वेचण्यासाठी गेली होती. काम सुरू असताना पिण्याचं पाणी आणण्यासाठी वृषाली एकटीच शेताजवळच्या ओढ्यावर गेली होती. कळशी भरून पाणी घेऊन परत येत असताना, पाठीमागून बिबट्याने अचानक वृषालीवर हल्ला केला.
बिबट्याने अचानक केलेल्या हल्ल्यामुळे काही कळायच्या आत वृषालीची मान बिबट्याच्या जबड्यात गेली. बिबट्यासोबत झालेल्या झटापटीतही वृषालीने प्रसंगावधान दाखवत, हातातील कळशीने बिबट्याच्या डोक्यावर एका पाठोपाठ एक वार केले. तीन-चार दणके बिबट्याच्या कपाळावर बसल्यानंतर बिबट्या जेरीस आला आणि भांबावून गेला. काही सेकंदाच्या थरारानंतर बिबट्याने माघार घेतली आणि वृषालीची मान जबड्यातून सोडली. यानंतर बिबट्याने जंगलाच्या दिशेनं पोबारा केला. या झटापटीत वृषालीच्या अंगावर काही ठिकाणी जखमा झाल्या आहेत. तसेच पायाला मोठी दुखापत झाली आहे. ही उघडकीस येताच, आसपासच्या लोकांनी त्वरित तिला पुसद येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.