भुसावळ (प्रतिनिधी) सफेद भिलावा देण्याच्या बहाण्याने तेलंगणातील तरुणांना भुसावळात बोलावून मारहाण करीत लुटण्यात आल्याची घटना शहरातील रेल्वे स्थानक ते साक्री फाट्यावरील जुना टोलनाक्यादरम्यान सोमवार सकाळी घडली. धक्कादायक म्हणजे पोलिसांनी या प्रकरणात दोन होमगार्डला अटक केली आहे.
तक्रारदार मिलवकुमार पूनम यांनी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाणे गाठत आपबिती सांगितल्यानंतर अशोक मोहितेसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदाराशी आरोपींनी साधलेला संपर्क क्रमांक तसेच स्टेशन परीसरातील सीसीटीव्ही फुटेजआधारे संशयित विनोद चंद्रकांत सोनवणे (३०, जाडगाव, ता. भुसावळ) व नरेंद्र विकास सपकाळे (३०, साकरी फाटा, भुसावळ) यांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे दोन्ही संशयित होमगार्ड आहेत. तपास पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हरीष भोये करीत आहेत.
मारहाण व लूट प्रकरणात होमगार्डचा सहभाग असल्याचे माहीती वरणगाव पोलिसांना मिळताच वरणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक भरत चौधरी, उप पोलिस निरिक्षक परशुराम दळवी यांनी दोघांचा शोध घेवून त्याच्याजवळील काही मुद्देमालासह भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
मिलवकुमार पूनम (२८, कोयागुड्डम मंडळ तेगुपल्ली, जि. बद्रादी, तेलगंना) यांना युट्यूबवर सफेद भिलावा संदर्भात माहिती मिळाल्यानंतर त्यांनी व्हिडिओखाली दिलेल्या संपर्क साधल्यानंतर संशयितांनी त्यांना भुसावळात बोलावले. ठरल्याप्रमाणे सोमवार, ११ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता पूनम व त्यांचा मित्र बुकीया हरीलाल हे भुसावळात आले व रेल्वे स्थानकाबाहेर संशयिताची भेट झाल्यानंतर त्यांनी साक्री फाट्याजवळील जुना टोल नाक्याजवळील खदानीत नेत काठीने मारहाण सुरू केली. संशयितांनी यावेळी २० हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल, २० हजारांची रोकड, २० हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी असा एकूण ४२ हजारांचा ऐवज हिसकावून संशयित पसार झाले.