पारोळा (प्रतिनिधी) शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या चार दुकानांचा पत्रा कापून चोरट्यांनी चोरी केली. यावेळी चोरट्यांनी काजू, बदाम, पिस्ता अशा खाद्य पदार्थांवर ताव मारत किरकोळ पैसे चोरुन नेले आहेत.
शहरातील मुख्य बाजार पेठेत १८ तारखेला मध्यरात्री ४ दुकानांवरील पत्रा कापून चोरी करण्याचा प्रयत्न केला. या चाेरट्यांनी राधामल प्रोव्हिजन, आशीर्वाद इलेक्ट्रिक, सद्गुरू प्रोव्हिजन व महावीर साडी सेंटर या एकाच रांगेत असलेल्या दुकानांचा पत्रा कापून दुकानात प्रवेश केला. यात चाेरट्यांनी राधामल प्रोव्हिजनमध्ये ३ हजार रुपये रोख तसेच काजू, बदाम, पिस्ता असा किराणा माल चोरला. मात्र, इतर ३ दुकानांमध्ये चोरट्यांच्या हातात केवळ किरकोळ चिल्लर लागली. विशेष म्हणजे अशा प्रकारे पत्रा कापून चोरीचे अनेक प्रकार वर्षभरात घडले आहे. दरम्यान, पाेलिसांनी गस्त वाढवून भुरट्या चाेरट्यांचा बंदाेबस्त करावा, अशी मागणी व्यापारी महासंघाचे केशव क्षत्रिय यांनी केली आहे.