जळगाव (प्रतिनिधी) जळगाव एमआयडीसीतील डी 12 सेक्टर मधील रायेटेक्स फार्मसीटीकल फॅक्टरीमध्ये चोरी करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी मुद्देमालसह अटक केली आहे. सागर अशोक गायकवाड (भिलाटी, मेहरुण, जळगाव),असे संशयित आरोपीचे नाव आहे.
जळगाव एमआयडीसीतील डी 12 सेक्टर मधील रायेटेक्स फार्मसीटीकल फॅक्टरीच्या स्टोअर रूममधून 86 हजार 500 रुपये किंमतीचे एस.एस.2.5 लीटर मापाच्या मिल्क कॅनचे दोनशे नग, एस.एस. स्पेअर लिड पाच लीटर मापाचे 755 नग, एक एच.पी.ची पाण्याची मोटार आदी साहित्याची 7 ते 20 जुलै दरम्यान चोरी झाली होती.
याबाबत प्रशांत दिलीपकुमार कोठारी (50, रा.विसंजीनगर, होमगार्ड ऑफीसजवळ, जिल्हापेठ, जळगाव) गुरुवारी फिर्याद दिल्यानंतर अज्ञात इसमांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयडीसी पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा करीत सागर अशोक गायकवाड (भिलाटी, मेहरुण, जळगाव) याच्या मुसक्या बांधल्या आहेत. संशयिताने अल्पवयीनाच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून 75 हजार 500 रुपये किंमतीचे साहित्य जप्त करण्यात आले.
ही कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, एमआयडीसी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, दीपक जगदाळे, एएसआय अतुल वंजारी, हवालदार रामकृष्ण पाटील, सचिन मुंढे, किशोर पाटील, साईनाथ मुंढे, सचिन पाटील, ललित नारखेडे, नाना तायडे, किरण पाटील आदींच्या पथकाने केली. तपास हवालदार रामकृष्ण साहेबराव पाटील करीत आहेत.