जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एमआयडीसी परिसरातील एका लॉन्समध्ये आयोजित लग्न समारंभात एका ज्येष्ठ महिला नागरिकाच्या गळ्यातील 21 ग्रॅम सोन्याची साखळी चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासामुळे आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन मार्फत सुरु आहे.
पुष्पाबाई जगन्नाथ न्याती (वय 85) या आपल्या नातेवाईकाच्या लग्न समारंभासाठी 6 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास लॉन्सवर उपस्थित होत्या. समारंभादरम्यान त्या एका खोलीत असताना अज्ञात इसमाने खोलीत प्रवेश करून त्यांच्या गळ्याला काहीतरी लागल्याचे भासवले. “ते मी काढून देतो,” असे म्हणत तो व्यक्ती त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करून पळून गेला.
या प्रकरणी त्यांच्या मुलगा हेमंत जगन्नाथ न्याती यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना वृद्ध महिलेशी संबंधित असल्याने प्रकरण गांभीर्याने घेऊन पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या. तपासादरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अनिल विजय हरताडे (रा. लक्ष्मीनगर, गेंदालाल मिल, जळगाव) याच्यावर संशय घेतला गेला. त्याला जळगाव शहरातून ताब्यात घेण्यात आले असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच चोरी केलेली सोनसाखळी त्याच्याच ताब्यातून मिळाली. त्याला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देऊन अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नकाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, अतुल वंजारी, पोलीस हेडकॉन्स्टेबल अक्रम शेख, बाबासाहेब पाटील यांचा सहभाग होता. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार दत्तात्रय बडगुजर हे करत आहेत.
















