मुंबई (वृत्तसंस्था) आम्हाला आश्चर्य वाटते ते देवेंद्र फडणवीस यांचे. त्यांना पुन्हा यायचे होते मुख्यमंत्री म्हणून, पण झाले उपमुख्यमंत्री. दुसरे असे की, हाच म्हणजे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचे हा फॉर्म्युला निवडणुकीपूर्वी दोघांनी ठरवला होता. मग तेव्हा मुख्यमंत्रीपदावरून युती का तोडली?,” असा प्रश्न शिवसेनेनं विचारला आहे.
शिवसेनेच्या सामना मुखपत्रातून 2019 साली ठरलेल्या कथित अडीच-अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्याची आठवण फडणवीसांना करुन देण्यात आली. तसेच अटलीबिहारी वाजपेयींपासूनचे संदर्भ देत सत्ता मिळ्यानंतर आता पुढे काय? असा प्रश्न शिवसेनेनं भाजपाला विचारला आहे. महाराष्ट्रात गुरुवारी जे घडले त्यावरून सत्ता हेच सर्वस्व आणि बाकी सगळे झूठ यावरच शिक्कामोर्तब झाले. सत्तेसाठी आम्ही शिवसेनेशी दगाबाजी केली नाही, असे सांगणाऱ्यांनीच मुख्यमंत्रीपदाचा मुकुट स्वतःवर चढवून घेतला. तोदेखील कोणाच्या पाठिंब्यावर, तर या सर्व बंडाशी आमचा काही संबंध नाही असा भाव जे साळसूदपणे आणत होते, त्यांच्या पाठिंब्यावर. म्हणजे शिवसेनेविषयीची नाराजी वगैरे हा सगळा बनाव होता. आम्हाला आश्चर्य वाटते ते देवेंद्र फडणवीस यांचे. त्यांना पुन्हा यायचे होते मुख्यमंत्री म्हणून, पण झाले उपमुख्यमंत्री. दुसरे असे की, हाच म्हणजे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचे हा फॉर्म्युला निवडणुकीपूर्वी दोघांनी ठरवला होता. मग तेव्हा मुख्यमंत्रीपदावरून युती का तोडली?, असा प्रश्न शिवसेनेनं विचारला आहे.
“विरोधकांना मिळेल त्या मार्गाने त्रास नव्हे, तर छळ करण्याचे तंत्र उदयास आले आहे. योगी श्री अरविंद एकदा म्हणाले होते, ‘‘राजसत्तेच्या हाती अधिकाधिक अधिकार सोपविण्याची प्रवृत्ती सध्या इतकी बळावली आहे की, त्यामुळे व्यक्तीच्या स्वतंत्र आणि स्वयंस्फूर्त प्रयत्नांना वावच मिळत नाही आणि जरी तो मिळाला तरी तो इतका अपुरा असतो की, शेवटी सत्तायंत्रणेपुढे व्यक्ती असहाय्य होऊन जाते!’’ आज विरोधी बोलणाऱ्या व्यक्तींना याच पाशवी तंत्राचा वापर करून दाबले जात आहे. जगभरात लोकशाहीचा डंका वाजवत फिरायचे आणि आपल्याच लोकशाही व व्यक्तिस्वातंत्र्याच्या दिव्याखाली अंधार, अशी सध्याची स्थिती आहे. विरोधी पक्षाचे अस्तित्व संपवून या देशात लोकशाही कशी जिवंत राहणार?,” असा प्रश्न शिवसेनेनं विचारला आहे.