धरणगाव (प्रतिनिधी) शिवसेना (ठाकरे गट) कडून नुकताच जाहीर प्रवेश सोहळ्यानंतर महाविकास आघाडीत खटके उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मित्र पक्षाच्याच कार्यकर्त्यांना फोडल्याची भावना कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाल्याची चर्चा आहे. विशेष करून संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्याबद्दल नाराजीचा सूर ऐकायला मिळतोय.
शिवसेना (ठाकरे गट) कडून नुकताच जाहीर प्रवेश सोहळ्यासह सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात शिंदे गटातील कार्यकर्त्यांची ‘घरवापसी’ची चर्चा होती. परंतू महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेले कॉंग्रेस-राष्ट्रवादीचेच कार्यकर्त्यांना प्रवेश दिला गेल्यामुळे महाविकास आघाडीत खटके उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अगदी मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच फोडल्याची भावना काही पदाधिकारी खाजगीत व्यक्त करत आहेत. धरणगाव शहरासह जळगाव ग्रामीण मतदार संघातील पाचशे विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यात जळगाव तालुक्यातील कानळदा व भोकर येथील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाचे कार्यकर्त्यांचाही समावेश होता.
या प्रवेश सोहळ्यामुळे मित्र पक्ष असलेले कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी संतापले आहेत. वास्तविक बघता ठाकरे गटाने शिंदे गटातील आपले कार्यकर्ते परत आणण्याचे ध्येय ठेवले पाहिजे होते. परंतू मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांची फोडाफोडी करणे चुकीची असल्याची भावना कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त करत आहेत. यामुळे संतापलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी आता धरणगावात आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कळते. थोडक्यात या प्रवेश सोहळ्यामुळे आगामी काळात धरणगाव महाविकास आघाडीत खटके उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष करून संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्याबद्दल नाराजीचा सूर ऐकायला मिळतोय. कारण राज्य पातळीवरील नेते असूनही त्यांनी मित्र पक्षातील कार्यकर्त्यांना प्रवेश देण्याबाबत रोखले पाहिजे होतं, असे काहींचे म्हणणे आहे.
दुसरीकडे कॉंग्रेसमध्ये कमालीची नाराजी आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून सत्तेत असतांना आणि आता विरोधात असतांनाही कॉंग्रेसला शिवसेनेने सन्मान दिला नाही. कुठल्याही कार्यक्रमाला बोलावले जात नाही. अगदी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीला बोलवण्यात आले. परंतू कॉंग्रेसच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला साधा कार्यक्रमाचा निरोपही देण्यात आला नाही, अशी भावना कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली.