रीवा (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशमधील भाजपाचे एक खासदार (MP) आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. भ्रष्टाचाराबाबत त्यांनी अजब विधान केलं आहे. गावातील सरपंचाने (Sarpanch) जर १५ लाखांपर्यंत भ्रष्टाचार (corruption) केला, तर त्यात काहीही गैर नाही. १५ लाखांपेक्षा अधिक भ्रष्टाचार केला तर त्याला आपण भ्रष्टाचार म्हणू शकतो. त्यामुळे सरपंचाने १५ लाखांपेक्षा अधिक भ्रष्टाचार केला तर तरच आमच्याकडे तक्रार करा, असं विधान खासदाराने केला आहे. या वादग्रस्त वक्तव्याचा एका व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतं आहे.
संबंधित वादग्रस्त विधान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या खासदाराचं नाव जनार्दन मिश्रा असून ते मध्य प्रदेशातील रीवा लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले खासदार आहे. त्यांनी गावपातळीवर सरपंचाकडून केल्या जाणाऱ्या भ्रष्टाचाराला पाठिंबा दिला असून यामध्ये काहीच गैर नसल्याचं म्हटलं आहे. एखाद्या सरपंचाने १५ लाख रुपयांपर्यंतचा भ्रष्टाचार केला असेल, तर मला सांगू नका. लाखो रुपये गुंतवून त्यांनं निवडणूक लढलेली असते. पुढील निवडणुकीसाठीही त्यांना पैशांची गरज आहे. त्यामुळे कोणत्याही सरपंचाने १५ लाखांहून अधिकचा भ्रष्टाचार केला तर तो चुकीचा आहे, असं अजब गजब विधान जनार्दन मिश्रा यांनी केलं आहे.
भाजप खासदार जनार्दन मिश्रा व्हिडीओत म्हणाले की, ‘गावातील सरपंचाने भ्रष्टाचार केला, अशी तक्रार घेऊन नागरिक जेव्हा माझ्याकडे येतात, तेव्हा मी त्यांना म्हणतो की, त्यांनी १५ लाखांपर्यंतचा भ्रष्टाचार केला असेल, तर कृपया आमच्याकडे तक्रार करू नका. जर सरपंचाने १५ लाखांपेक्षा अधिक भ्रष्टाचार केला असेल, तर त्याला आपण भ्रष्टाचार म्हणू शकतो. कारण सरपंचाने निवडणुकीत ७ लाख रुपये गुंतवलेले असतात. तसेच पुढील निवडणुकीसाठी त्याला आणखी ७ लाखांची गरज असते. महागाई वाढली तर आणखी १ लाख जोडा. त्यामुळे ते १५ लाख रुपयांचा घोळ करत असतील, तर त्याला भ्रष्टाचार म्हणता येणार नाही. हीच समाजाची सद्यस्थिती आहे.’