मुंबई (वृत्तसंस्था) “लसीकरण आहे पण लस नाही. खाटा आहेत पण ऑक्सिजन नाही, उपचार आहे पण औषध नाही, व्यापारी आहे पण व्यापार नाही, लोक आहेत पण नोकरी नाही, मन की बात आहे पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत, सगळंच रामभरोसे आहे पण त्यात काहीच राम नाही,” असं म्हणत संदीप देशपांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.
देशात कोरोनाच्या महामारीमुळे अभूतपूर्व परिस्थितीने डोकं वर काढलं आहे. पहिल्या लाटेपेक्षाही भयंकर थैमान दुसऱ्या लाटेनं घातलं असून, देशात आणि राज्यात रुग्ण आणि नातेवाईकांबरोबर सर्वसामान्यांनाही हालअपेष्टा सोसोव्या लागत आहे. बेड, ऑक्सिजनअभावी रुग्णांचे जीव जात आहेत. तर दुसरीकडे हातावर पोट असणाऱ्यांचे कडक निर्बंधांमुळे हाल होऊ लागले आहेत. याच विदारक परिस्थितीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“लसीकरण आहे पण लस नाही. खाटा आहेत पण ऑक्सिजन नाही, उपचार आहे पण औषध नाही, व्यापारी आहे पण व्यापार नाही, लोक आहेत पण नोकरी नाही, मन की बात आहे पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत, सगळंच रामभरोसे आहे पण त्यात काहीच राम नाही,” असा खोचक टोला संदीप देशपांडेंनी लगावला आहे.
राज्यात काल नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या जवळपास १० हजारांनी जास्त आहे. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. राज्यात काल दिवसभरात ५९ हजार ५०० कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर गेल्या २४ तासांत राज्यात ४८ हजार ६२१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात काल ५६७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.