मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मांडलेल्या भूमिकेचं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्वागत केलं आहे. त्याचबरोबर देश हुकुमशाहीच्या उंबरठ्यावर असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अशा काही घटना घडताना दिसतील की, ज्या तुम्हाला आश्चर्यकारक वाटतील, अशी परिस्थिती आहे’, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोला येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देश हुकुमशाहीच्या वाटेवर असल्याचं मत मांडलं. संघराज्य पद्धतीचा भंग करण्याचं काम केंद्राकडून होत असल्याच्या उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘हे जुनंच आहे, पण आता सगळ्यांना त्याची जाणीव व्हायला लागली आहे. संविधान बदलणार, नवीन संविधान आलं, तर हुकुमशाही येण्याची शक्यता आहे. त्या हुकुमशाहीला आपण तोंड देऊ शकणार नाही. म्हणून ते आता आपापल्या मतदारांना सांगत आहेत.’
‘आता हे पक्ष आपल्या मतदारांना आपण संविधानवादी झालं पाहिजे, असं सांगत आहेत. ही फार चांगली गोष्ट आहे. स्वागतार्ह आहे. देश हुकुमशाहीच्या उंबरठ्यावर आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अशा काही घटना घडताना दिसतील की, ज्या तुम्हाला आश्चर्यकारक वाटतील, अशी परिस्थिती आहे’, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
मागच्या आठवड्यात महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारच्या विरोधात केलेला बंद तोंडदेखलेपणा आणि देखावा होता. केंद्राने केलेल्या कायद्याचे मूळ काँग्रेस-राष्ट्रवादीने २००५-०६ मध्ये केलेल्या कायद्यात असल्याचा दावा आंबेडकर यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण कसं कमी झालं? असा सवालही आंबेडकर यांनी उपस्थित केला.