मुंबई (वृत्तसंस्था) नोटाबंदी झाल्यावर शेकडो लोकांना नोकरी आणि प्राण गमवावा लागला होता. त्यामुळे नोटाबंदीच्या घिसडघाईबद्दल केंद्र सरकारने देशाची माफी मगाायला हवी, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली असून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी महाराष्ट्रातून केंद्र सरकार उखडून फेका असं आवाहन केलं आहे. नड्डा यांच्या आवाहनाची राऊत यांनी खिल्ली उडवली आहे. जेपी नड्डा सदगृहस्थ आहेत. चांगले नेते आहेत. त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचं सरकार उखडून फेका. त्याच्याआधी त्यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये चीन जे घुसलं आहे आणि चीनने आपल्या हद्दीत गावं बसवली आहेत. त्यांनी सर्वात आधी अरुणाचलप्रदेशातून चीनला उखडून फेकलं पाहिजे. जम्मू काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ले वाढले आहेत. अतिरेक्यांचे अड्डे वाढले आहेत. त्यांना ताबडतोब उखडून फेकलं पाहिजे, असं आव्हानच त्यांनी केलं.
भाजपची भूमिका समजू शकतो. महाराष्ट्रात प्रयत्न करूनही भाजपला आघाडीचा बालही बाका करता आला नाही. इतकं मोठं राज्य, केंद्रीय सत्ता, संपूर्ण केंद्रीय यंत्रणा हाताशी धरून दहशत, दबाव आणि पैसा याचा वापर करूनही सरकार पडत नसेल तर वैफल्य येणं हे स्वाभाविक आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.