जळगाव (प्रतिनिधी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेच्या दोन तृतीयांश सदस्य संख्येचे बहुमत आहे. त्यामुळे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह त्यांनाच मिळायला हवे, असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. पण याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल, असेही त्यांनी सांगितले. ते अजिंठा विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
रामदास आठवले पुढे म्हणाले की, शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार असल्याचे समाधान आहे. त्यांना विरोध नाही. सत्ता असूनही मुख्यमंत्री शिंदेना हे मैदान मिळाले नाही. तरीही शिंदे यांचा बीकेसी मैदानावर होणारा दसरा मेळावा सरस असेल. ठाकरेंच्या टिकेला प्रत्युत्तर देण्याचे सामर्थ्य शिंदेमध्ये आहे. शिंदेच्या मेळाव्यातील भाषण ऐकणार आहे. ठाकरेंचेही भाषण ऐकावे लागेल. भुसावळ येथे साजऱ्या होणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या 66 वर्धापन दिनानिमित्त आठवले जळगावात आले होते. अजिंठा विश्रामगृह येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिंदे यांच्याकडे दोन तृतांश बहुमत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह त्यांनाच द्यावे, अशी रिपाइंची मागणी आहे.
शिवसेनेने व्यक्तीगत टीका करु नये. त्यामुळे त्यांचे अजून नुकसान होईल. पानटपरीवाला म्हणून गुलाबराव पाटील यांना हिणवले. पानटपरीवाला कधी कुणाला चुना लावेल,हे सांगता येत नाही. शिवसेनेत पडलेली एवढी मोठी फूट ही ठाकरेंना मोठी चपराक आहे. खडसे हे माझे चांगले मित्र आहेत. ते कोणत्या पक्षात जातात, हा पक्षांतर्गत विषय असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नसून भारत ताेडो यात्रा आहे. काॅंग्रेसचे बळ कमी झालेले आहे. केरळमधील पदयात्रेत पावसात भिजण्याच्या प्रसंगावर राहुल गांधी हे शरद पवार यांची कॉपी करत असल्याची टीका श्री. आठवले यांनी केली.
आम्ही शिंदे सरकार कोसळू देणार नाही. सर्वांना मंत्री करता येत नाही पण मंत्री केले नाही म्हणून कुणीही आमदार शिंदे यांना सोडून परत जाणार नाही. अजित पवार यांना पहाटेच्या शपथविधीची सवय आहे. ते इकडे येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे, असेही आठवले एका प्रश्नावर बोलताना म्हणाले.