भोपाळ (वृत्तसंस्था) आपल्या वादग्रस्त विधानांनामुळे कायम चर्चेत राहणाऱ्या भोपाळच्या भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. जे खरोखर देशभक्त आहेत, ते हेमंत करकरेंना देशभक्त म्हणत नाहीत, असं प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या.
यासंबंधी एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणतात की, “मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना काही लोक देशभक्त मानतात. पण खरे देशभक्त असलेले लोक त्यांना देशभक्त मानत नाहीत. देशासाठी मी माझं जीवन समर्पित केलं आहे. माझ्यासारख्या स्वयंसेवकाला त्यांनी त्रास दिला.” देशात एक आणिबाणी १९७५ साली लागली होती. तशाच प्रकारची आणखी एक आणिबाणी ही २००८ साली लागल्याचं सांगत आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा आरोपही प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला. आपल्याला शिक्षण देणाऱ्या आचार्यांच्या हाताची बोटं हेमंत करकरे यांनी तोडल्याचंही प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सांगितलं.
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या २००८ साली मालेगावात झालेल्या स्फोटातील एक आरोपी आहेत. त्यावेळचे महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांनी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना अटक करत त्यांची चौकशी केली होती. साध्वींचा हा खळबळजनक विधानाचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची देखील शक्यता आहे.