जळगाव (प्रतिनिधी) नातेवाईकांच्या लग्न कार्यक्रमासाठी गेलेल्या पोलीस कर्मचार्याच्या घरी चोरट्यानी डल्ला मारत २ लाख २४ हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दिपक रावसाहेब जगताप (वय- ४७ रा. अयोध्या नगर ता. चाळीसगाव) हे धुळे येथे नातेवाईकांच्या लग्न कार्यक्रमासाठी जात असताना घराला कुलूप लावून त्याची चावी त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर राहणारे भाडेकरू प्रेमसिंग उर्फ बबलू राजपूत यांचेकडे दिली होती. २६ रोजी रात्री घरी परत आल्यावर जगताप यांना घराचे दार उघडे दिसले. कुलूप बाहेर भिंतीवर ठेवलेले होते. घरातील लाकडी कपाटाचे दरवाजेही उघडे होते. या कपाटातील १ लाख ६८ हजार रुपयांची रोकड, २० हजार रुपये किंमतीची पाच ग्रॅम सोन्याची अंगठी, १६ हजार रुपये किंमतीची चार ग्रॅम कानातील टॉप्स, २० हजार रुपये किंमतीची पाच ग्रॅम वजनाची चेन असा एकूण २ लाख २४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
दरम्यान, एकाकडे विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली म्हणून त्यांच्यावर जगताप यांनी संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी शहर पोलीसात दिपक जगताप यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.