बोदवड (प्रतिनिधी) शहरतील धान्य दुकानाचे शटर वाकवून अज्ञात चोरट्यांना १ लाख १४ हजार रुपये किमतीची १९ क्विंटल तूर लांबविल्याची घटना घडली होती. याप्रकरणी बोदवड पोलिसांनी चोवीस तासात करून आज चोरांना अटक केली आहे. संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील न.ह. रांका हायस्कूलसमोर अनिल गुलाबचंद अग्रवाल यांचे धान्य खरेदी विक्रीचे दुकान आहे. २६ मे रोजी सकाळी ११ वाजता ते दुकान बंद करून घरी गेले. त्यानंतर २७ मे रोजी सकाळी ७ वाजता त्यांना अनिल खेवलकर यांनी फोनद्वारे तुमच्या धान्य दुकानाचे शटर अर्धवट उघडे असून बाहेर तुरी सांडल्याची माहिती दिली. यानंतर अग्रवाल तातडीने मुलासह दुकानात आले. त्यांनी केलेल्या पाहणीत दुकानाचे पूर्व बाजूकडील शटरचे कुलूप तोडून दुकानातील एकूण १ लाख १४ हजार रुपये किमतीची १९ क्विंटल तूर चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर याप्रकरणी बोदवड पोलिसात गुन्हा दाखल होत पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनखाली तपास सुरु होता. त्यानुसार पोलीस निरीक्षक यांना बातमीदारामार्फत जामनेर शहरात पॅजो रिक्षा क्रमांक एम.एच. १९ बी.एम. ४१ ९३ ने दोन जण तुरीचे भरलेले कट्टे विक्री करिता व्यापाऱ्याकडे फिरत आहे. माहिती मिळताच पोलिसांनी जामनेर गाठता रिक्षा चालकास ताब्यात घेत चौकशी केली असता सदरचा माल हा चोरीचा असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर रिक्षा चालक व त्याच्या सोबतच्या एकाला ताब्यात घेत बोदवड पोलीस ठाण्यात आणण्यात येऊन पुन्हा चौकशी केली असता त्याने तुरीचे कट्टे कुठून आणि कोणी दिले याबाबत माहिती दिली. या माहितीच्या आधारवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शहरातील विविध भागातून सात संशयितांना ताब्यात घेतले.
यात शेख इमरान शे इस्माईल (रा. सतरंजी मोहल्ला बोदवड), वंडर उर्फ प्रशांत विश्वनाथ माळी, चिंता उर्फ किसान संजय मोरे, सोनू उर्फ सुनील सोपन पवार भुरा आनंदा सोनावणे (सर्व रा. भिलवाडा, बोदवड), आलीम सलीम पिंजारी व शरीफ काल्या उर्फ शरीफ खाँ उस्मान खाँ पठाण (रा. देऊळगाव गुजरी, ता. जामनेर) यांना अटक करत त्याच्याकडून ६० हजार रुपये किमतीची तूर व पॅजो रिक्षा असा १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयित आरोपीना न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने २ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर गणेश सोपान पवार (रा. भिलवाडा, बोदवड) हा फरार आहे. या चोरीचा तपास करून चोवीस तासात पोलीस निरीक्षक राहुल, गायकवाड उपपोलिस निरिक्षक प्रमोद कठोर, वसीम तडवी, वसंत निकम, शशिकांत महाले, मनोज पाटील, इरफान पिजारी, समीर पिजारी, तुषार इकडे, निलेश सिरसोदे, दिपक पाटील या पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाई केली.