अमळनेर (प्रतिनिधी) काही दिवसांपासून घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने, चांदीच्या मूर्त्या, पितळे भांडे आणि रोकड असा एकूण ५९ हजार २०० रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना अमळनेर तालुक्यातील मुंगसे गावात रविवारी २८ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चंद्रकांत अर्जुन पाटील वय-५४, रा. मुंगसे ता. अमळनेर ह.मु. पुणे हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान १५ जून ते २८ जुलै दरम्यान त्यांचे घर बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातून सोन्याचे दागिने, चांदीच्या मुर्त्या, पितळे भांडे आणि अडीच हजार रुपयांची रोकड असा एकूण ५९ हजार २०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. चंद्रकांत पाटील हे रविवारी २८ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता घरी आले, तेव्हा घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी दुसऱ्या दिवशी सोमवारी २९ जुलै रोजी दुपारी २ वाजता अमळनेर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.