जळगाव (प्रतिनिधी) : देवीच्या दर्शनासाठी रावेर तालुक्यातील वाघोदा येथे गेलेल्या सेवानिवृत्त कर्मचारी सुभाष रघुनाथ महाजन (वय ७२, रा. राधा रमण अपार्टमेंट, शिव कॉलनी) यांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला. याठिकाणाहून चोरट्यांनी ४ हजार रुपयांच्या रोकडसह १ लाख ४८ हजार रुपये किंमतीचे सोने चांदीचे दागिने चोरुन नेले. ही घटना दि. २० रोजी भरदिवसा घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील शिवकॉलनीतील राधा रमन रेसीडेन्सी अपार्टमेंटमध्ये सुभाष महाजन हे सेवानिवृत्त कर्मचारी कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. दि. २० डिसंबर रोजी सकाळी ते त्यांचे मूळ गाव असलेल्या रावेर तालुक्यातील वाघोदा येथे देवीच्या दर्शनासाठी गेले होते. सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ते घरी परतल्यानंतर त्यांना घराच्या दरवाजाला लावलेले कुलूप दिसून आले नाही. त्यामुळे त्यांनी लागलीच घरात जावून पाहणी केली. यावेळी त्यांना लोखंडी कपाटात ठेवत असलेला चिल्लरचा डबा हॉलमधील कॉटवर पडलेला दिसून आला. त्यामुळे त्यांना घरात चोरी झाल्याची शंका आली.
लॉकरमधून चोरट्यांनी लांबवला ऐवज
महाजन कुटुंबियांनी लागलीच घरातील इतर रुममध्ये पाहणी केली असता, त्यांना घरातील लोखंडी कपाट उघडी असल्याची दिसले. तर त्यातील लॉकर तोडून त्यांच्या लग्नातील सोने चांदीचे दागिने चोरी झाल्याचे दिसून आले.
चोरट्यांनी चोरुन नेला ऐवज
चोरट्यांनी महाजन यांच्या घरातून चार हजारांची रोख रक्कमेसह २४ हजार रुपयांच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, ३६ हजार रुपये किमतीचे कर्णफुले, दीड हजार रुपये किमतीची चांदीची साखळी, दीड हजार रुपयांच्या चांदीच्या अंगठ्या, एक हजार रुपये किमतीचे चांदीचे करधोडे असा एकूण एक लाख ४८ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
घरफोडी झाल्याची खात्री झाल्यानंतर चोरट्यांनी घटनेची माहिती रामानंद नगर पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्याठिकाणाहून पुरावे गोळा केले पोलीस आता परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करुन चोरट्यांचा शोध घेत आहे.















