जळगाव (प्रतिनिधी) सासूचे निधन झाल्याने सहकुटुंबिय अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घराच्या घराचा कडीकोयंडा तोडून डल्ला मारल्याची घटना शहरातील जिजाऊ नगरात घडली. याठिकाणाहून चोरट्यांनी २० हजाराच्या रोकडसह सोने चांदीचे दागिने असे एकूण ३७ हजारांचा ऐवल लंपास केला.
याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील जिजाऊ नगरात प्रकाश खैरनार हे वास्तव्यास असून ते प्लायवूडचे व्यावसायीक आहेत. खैरनार यांच्या सासूंचे दि. २९ जुलै शनिवारी रोजी रात्री निधन झाले. त्यामुळे खैरनार कुटुंबीय रात्री ११ वाजता मालेगाव येथे जाण्यासाठी निघाले. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरामध्ये असलेल्या कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून देत कपाटातील रोकड व देव घरातील देवीची मुर्ती आणि चांदीचे शिक्के घेवून चोरटे पसार झाले.
दुसऱ्या दिवशी सकाळी खैरनार यांच्या घरा शेजारील महिलेला त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले दिसल्याने त्यांनी लागलीच घटनेची माहिती प्रकाश खैरनार यांना दिली. त्यानंतर प्रकाश खैरनार हे लागलीच घराकडे येण्यासाठी निघाले. दरम्यान त्यांनी सोमवारी दुपारी तालुका पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.