मुंबई (वृत्तसंस्था) माझा फोटो माझ्या परवानगीनेच वापरण्यात यावा. मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, त्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत. याऊलट ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला. ज्यांच्याशी माझे आता वैचारिक मतभेद आहेत. अगदी माझ्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी माझे फोटो लावू नयेत, अशी इशारा शरद पवारांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अनेक ठिकाणी त्यांच्या अभिनंदनाचे पोस्टर, बॅनर्स झळकत आहेत. या बॅनर्सवर शरद पवारांचेही फोटो आहेत. यामुळे संतापलेल्या शरद पवारांनी अजित पवारांच्या गटाला परवानगीशिवाय फोटो वापरण्यास मनाई केली आहे. माझ्या विचारधारेशी गद्दारी करणाऱ्यांना माझे छायाचित्र वापरण्याचा अधिकार नाही, अशा शब्दात त्यांनी अजित पवार गटाला खडसावले आहे.
अजित पवार यांनी काही आमदारांना हाताशी घेत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार आणि आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. शपथविधी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छांच्या होर्डिंगवर शरद पवार यांचे फोटो लावण्याचे आदेश दिले होते. आज शरद पवार यांनी आपल्या शैलीत अजित पवारांना खडसावले आहे. माझ्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना फोटो वापरण्याचा अधिकार नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत.