जळगाव (प्रतिनिधी) नंदी बैल घेवून भविष्यवाणी सांगण्यासाठी आलेल्यांनी तरुणाला संमोहीत केले. त्यानंतर एक इसम त्या तरुणाच्या घरात जावून त्यांनी दाम्पत्याला २७ हजार रुपयात गंडवले. ही घटना दि. १ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास एमआयडीसी परिरातील जगवानी नगरात घडली.
नेमकं काय घडलं !
शहरात गेल्या काही दिवसांपासून नंदी बैल घेवून आलेले काही जण विविध भागांमध्ये फिरत आहे. नागरिकांना नंदीची पुजा करुन त्यांना कौटुंबिक समस्यांसह त्यांच्या व्यवसाय व नोकरी विषयी माहिती देत आहे. तसेच नागरिक देखील त्यांच्यावर विश्वास ठेवत असून त्यांच्याकडून भविष्य देखील जाणून घेत आहे. दि. १ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास जगवानी नगरात दोन इसम एक लहान मुलासह नंदीबैल घेवून आले होते. त्यांनी परिसरातील नागरिकांना त्यांच्या जिव्हाळ्याच्या व कौटुंबिक गोष्टी सांगण्यास सुरुवात केली. दरम्यान, नागरिकांना त्यांच्या गोष्टी खऱ्या भासु लागल्याने ते देखील नंदीची पुजा करुन त्यांच्याकडून गोष्टी ऐकून घेत होते. याचवेळी त्या परिसरात राहणारे सुरेश पाटील हे व्यावसायीक त्यांच्या मुलीला शाळेतून घरी सोडण्यासाठी आले होते. त्यांनी घराच्या अपार्टमेंटमध्ये आपली दुचाकी पार्कीग करीत असतांना नंदीबैलासोबत आलेल्या एकाने त्यांच्यासोबत संवाद साधण्यास सुरुवात केली.
पाणी पिण्याच्या बहाण्याने केले संमोहीत !
संवाद साधत असतांना त्या इसमाने सुरेश पाटील यांना संमोहीत करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सुरेश पाटील हे त्यांच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या घरात निघून गेले. यावेळी तो इसम पाणी पिण्याच्या बहाण्याने सुरेश पाटील यांच्या मागे त्यांच्या घराकडे गेला. दरम्यान, त्या इसमाने सुरेश पाटील यांना व्यवसायात होणाऱ्या प्रगतीबाबत काही गोष्टी सांगत असतांना त्यांच्या पत्नीने त्या इसमाला पाणी दिले. हीच संधी साधत त्या इसमाने त्या विवाहितेला देखील संमोहीत केले.
पैसे घेतल्यानंतर पसार !
दाम्पत्याला संमोहीत करीत आपल्या जाळ्यात अडकविल्यानंतर त्यांनी घरात ठेवलेली २७ हजारांची रोकड त्या इसमाकडे दिली. त्यानंतर नंदी बैल घेवून आलेले लोक तेथून पसार झाले. काही तासानंतर सुरेश पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी त्यांना हा प्रकार समजताच कुटुंबियांना झालेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. दरम्यान, शहरात गेल्या काही दिवसांपासून नंदीबैल घेवून आलेल्यांची टोळीने अनेकांना संमोहीत करुन लुटल्याचा घटना समोर येत आहे. सोशल मीडियावर देखील याबाबतचे मॅसेज व्हायरल झाले आहे.