पारोळा (प्रतिनिधी) शहरातील कॅप्टन नगर भागातील तीन घरातून चोरट्यांनी रोख रक्कमेसह चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात संजय रमेश चौधरी (वय ४२ रा.कॅप्टन नगर प्लॉट नंबर १३ ता पारोळा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १ जून २०२२ रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास संजय चौधरी हे परिवारासह चाळीसगाव येथे लग्नासाठी गेले होते. दिनांक ३ जून २०२२ रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास संजय चौधरी यांच्या घरासमोर राहणारी वर्षा पाटील यांनी त्यांना फोन करुन सांगितले की, तुमच्या घराचा दरवाजा उघडा असून चोरी झाल्याचे कळविले. संजय चौधरी हे सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घरी आले. त्यांनी घरात आत जाऊन प्रवेश केला असता घराच्या दरवाज्याची कडी कोंडा कुणीतरी अज्ञात चोरट्याने तोडून आत प्रवेश करुन घरातील ३० हजार रुपये रोख रक्कम, २ हजार रुपये किंमतीचे चांदीचे ४ भार वजानाचे दागिने लंपास केले होते. तर चौधरी यांच्याच कॉलनीत राहणारे भाऊसाहेब दत्तात्रय पाटील यांच्या घराचा देखील कडी कोंडा तोडून घरातील १० हजार रुपये रोख चोरी करुन घरफोडी केली आहे. तसेच सुनिल भटू पाटील यांच्या घरात देखील ३२ हजार रुपयांची घराची चोरी करुन घरफोडी केली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव हे करीत आहेत.