जळगाव (प्रतिनिधी) महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दि. ३० पर्यंत नामनिर्देशन अर्ज भरण्यात आले असून दि. ३१ बुधवार रोजी अर्जाची छाननी करण्यात आली. यामध्ये भाजपाचा १ तर शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे १ उमेदवाराचा एबी फॉर्ममध्ये चुका असल्यामुळे दोन्ही अपक्ष लढणार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या एका उमेदवाराचे सुचक डबल असल्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरला आहे. तसेच शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या एका उमेदवाराच्या अर्जावर स्वतःचीच स्वाक्षरी नसल्यामुळे त्यांचा देखील अर्ज अवैध ठरला आहे.
प्रभाग क्रमांक ६ अ मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार जयश्री धांडे यांच्या ए.बी. फॉर्मवर स्वाक्षरी नसल्यामुळे त्यांचा एबी फॉर्म रद्द झाला असून प्रभाग क्रमांक ९ अ मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार नितीन तुळशिराम जाधव यांच्या अर्जावर स्वाक्षरीच नसल्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. तसेच प्रभाग क्रमांक ३ क मधून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या डॉ. सुषमा दिपक चौधरी यांच्या एबी फॉर्मवर डॉ. सुषमा दिपक चौधरी ऐवजी डॉ. सुषमा दिलिप चौधरी असे नाव टाकण्यात आल्यामुळे त्यांचा ए. बी. फॉर्म रद्द करण्यात आला आहे.
प्रभाग क्रमांक १५ ड मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खुशाल तिलकनाथ शर्मा यांच्या अर्जाला सूचक असलेला व्यक्ती दोन ठिकाणी असल्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरला आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांचे ३ उमेदवार अपक्ष निवडणूक लढणार आहेत. तर, प्रभाग क्रमांक ४ अ मधून माधवी बागरे यांनी मध्यप्रदेश राज्यातील जात प्रमाणपत्र जोडल्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आलेला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांसह उमेदवारांचा हिरमोड झाला असून नगरसेवक होण्याचे दोघांचे स्वप्न भंग झाले आहे.
















