नाशिक (वृत्तसंस्था) त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिरडी ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीचे खोलीकरण व दुरुस्तीचे काम चालू असताना १८ एप्रिलला रात्री – आठच्या सुमारास जिलेटिनच्या स्फोटात बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील तिघा मजुरांचा मृत्यू झाला असून एक जखमी आहे.
लहू जालिंदर महाजन (३९, वंजारवाडी, ता. आष्टी, जि. बीड), बिभीषण श्यामराव जगताप (३६, रा. धिरडी, ता. आष्टी, जि. बीड), आबा उर्फ पिनू एकनाथ बोरुडे (३६, रा. बोराडेवाडी, ता. आष्टी, जि. बीड) अशी मृत मजुरांची नावे आहेत. विठ्ठल खोटरे (जि. नाशिक ) हा जखमी असून जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. हिरडी गावात तीन दिवसांपासून सार्वजनिक विहिरीच्या खोलीकरणाचे काम चालू होते. १८ एप्रिलला रात्री ८ ते ९ दरम्यान जोरात स्फोटाचा आवाज आला. विहिरीजवळ असलेल्या स्थानिकांना ओरडण्याच्या आवाजामुळे मोठा अपघात घडल्याचे लक्षात आले. यावेळी रोहिले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून रोहिले व हिरडीच्या तरुणांनी तीनही जखमी मजुरांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.
दरम्यान, बॉम्बशोधक पथक तसेच फॉरेन्सिक तज्ञांनी भेट देत विहीर किंवा परिसरात जिलेटिन कांड्यांचा शोध घेतला. पोलिसांनी विहिरीचा परिसर सील केला आहे. या कामास आम्ही परवानगी दिलीच नाही, असे ग्रामपंचायतीने म्हटले आहे. मंजूर कामाबद्दल पंचायत समितीने महसूल विभागाला लेखी अहवाल सादर करत अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयाने तीन मजुरांच्या मृत्यूबाबत माहिती दिली. परंतु, विनापरवानगी काम कसे चालू होते माहिती दिली नाही.