जळगाव (प्रतिनिधी) दुचाकीवरुन आलेल्यांनी तिघांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून ग्रामपंचायतीजवळ बसलेल्या एका वृद्धाला लुटल्याची खळबळजनक घटना घडली आहे. वाल्मिक अंकात बिऱ्हाडे (वय ७२, रा. भोळेनगर, असोदा), असे वृद्धाचे नाव आहे. ही घटना दि. १४ जून रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास असोदा गावात घडली. याप्रकरणी संशयित वैभव विजय सपकाळे (कोळी), कल्पेश निलेश इंगळे (माळी) व दीपक पुंडलिक उर्फ धनराज सपकाळे (कोळी) या तिघांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील असोदा गावात वाल्मिक बिऱ्हाडे हे वृद्ध वास्तव्यास आहे. दि. १४ जून रोजी सायंकाळी ते ग्रामपंचायतीजवळ बसलेले असतांना त्यावेळी गावातील वैभव सपकाळे हा त्यांच्याजवळ आला. त्याच्यासोबत कल्पेश इंगळे व दीपक उर्फ धनराज सपकाळे हे दोघ देखील होते. दरम्यान, वैभव याने वाल्मिक बिऱ्हाडे यांच्याकडे हजार रुपयांची मागणी केली. तेव्हा त्यांनी माझ्याजवळ पैसे नाही असे सांगितले. त्यावर कल्पेश इंगळे याने त्याच्या कंबरेला खोचलेले धारदार हत्यार बाहेर काढले आणि वृद्धाच्या मानेला लावून पैसे देतो का नाही, तर तुला हत्याराने मारून टाकू अशी धमकी दिली.
यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या वैभव सपकाळे याने वृद्धाच्या खिशातून दोन हजारांची रोकड जबदरस्तीने हिसकावून घेत ते तेथून पसार झाले. जाब विचारणाऱ्याला दिली जीवेठार मारण्याची धमकी हा प्रकार तेथून जाणाऱ्या गावातील एकाने बघितला, त्यांनी त्या टवाळखोरांना याबाबत जाब विचारला. मात्र त्यांनी तू इथून चालला जा नाही तर तुला देखील येथेच आडवा पाडू अशी धमकी दिली. दरम्यान, याप्रकरणी बिऱ्हाडे यांनी लागलीच तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरु तिघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.