श्रीनगर (वृत्तसंस्था) जम्मू काश्मीरच्या पुलवामा सेक्टरमध्ये आज सकाळी भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकी दरम्यान आतापर्यंत भारतीय सैन्याच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर-ए-तौयबाचा कमांडर अबू हुरैरा याचाही समावेश आहे.
काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एक लष्कर-ए-तैयबाचा पाकिस्तानी कमांडर एजाज उर्फ अबू हुरैरा आहे. यासह दोन स्थानिक दहशतवादीही ठार झाले आहेत. तथापि, अद्याप सुरक्षा दलांची कारवाई सुरू आहे.
पोलीस, लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाला दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर संयुक्त कारवाई करत परिसर सील केल्यानंतर चकमकीला सुरुवात झाली होती. यावेळी तीन दहशतवादी ठार करण्यात आले. यामध्ये लष्कर-ए-तोयबाचा कमांडर एजाज उर्फ अबु हुरैरा याचाही समावेश आहे. दरम्यान चकमकीनंतर पुलवामा शहरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
एका महिन्यात १२ दहशतवादी ठार
जुलै महिन्याच्या १४ दिवसात जम्मू काश्मीरमध्ये १२ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. याआधी २ जुलै रोजी पुलवामामध्ये दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ५ दहशतवादी ठार झाले. त्यानंतर ८ जुलै रोजी २ पाकिस्तानी दहशतवादी चकमकी दरम्यान मरण पावले. या ऑपरेशनमध्ये एक ज्युनियर कमिशन ऑफिसरसह दोन जवान शहीद झाले. १२ जुलै रोजी राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये दादलच्या जंगलात जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केलं.